प्रतापगढ : वृत्तसंस्था – मागील काही वर्षात उत्तर प्रदेशात अनेक पत्रकारांची हत्या किंवा संशयित पद्दतीने मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ या ठिकाणी सुलभ श्रीवास्तव या पत्रकाराचा संदिग्ध मृत्यू झाला आहे. ते एबीपी या वृत्तवाहिनीसाठी काम करत होते. काल सायंकाळी कटरा रोडवरील एका विट भट्टीच्या ठिकाणी सुलभ श्रीवास्तव गंभीर जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वी मृत श्रीवास्तव यांनी पोलिसांना एक पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. सुलभ यांनी 12 जून रोजी ADG आणि एसपी यांना पत्र लिहून त्यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली होती. त्यांनी आपल्या पत्रात जिल्ह्यातील दारू माफियाविरोधात बातमी केल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले होते. काल सायंकाळी आपल्या सहकाऱ्यासोबत एक बातमी करून परत येत असताना हा सगळा प्रकार घडला. हा अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे तर सुलभ यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत. सुलभ यांच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं काळंबेर असल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
काल सायंकाळी आम्ही एक बातमी कव्हर करून घरी परत येत होतो. मृत सुलभ आमच्या पाठीमागून आपल्या दुचाकीवरून येत होते. आम्ही काही अंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला एक फोन आला की, सुलभ यांचा अपघात झाला आहे. आम्ही लगेच माघारी फिरलो तेव्हा सुलभ हे कटरा रोडवरील एका विटभट्टीजवळ जखमी अवस्थेत पडले होते. त्यानंतर त्यांना आम्ही तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी त्यांचा मुत्यू झाला अशी माहिती सुलभ यांच्या एका सहकाऱ्यानी दिली.