सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महावितरण कंपनीकडून कोणतीही लेखी पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी नागठाणे (ता.सातारा) येथून गणेशवाडी येथील महावितरण कार्यालयावर नागठाणे परीसरातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भव्य आक्रोश मोर्चा काढला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. सुमारे पाच तास मोर्चेकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सुमारे 100 हुन जास्त मोर्चेकऱ्यांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले.
महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना चुकीची विजबिले देऊन ती सक्तीने वसूल केली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता शेतीपंपाची कनेक्शन महावितरण जबरदारीने कट करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शिवारातील असणारी उभी पिके पाण्याभावी वाळून जात आहेत. वीज वितरण कंपनीकडून शेतकऱयांची पठाणी पद्धतीने वसुली सुरू आहे. यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परीसरतील शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा गणेशवाडी येथील कार्यालयावर काढण्यात आला होता.
नागठाणे येथील स्वागत कमानीपासून या मोर्चाची सुरवात झाली.परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात या मोर्चात सहभागी झाला होता.सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत हा आक्रोश मोर्चा गणेशवाडी येथील महावितरणच्या कार्यालयाच्या गेटवर पोहचला.यावेळी वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र बारशिंग,सातारा ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ,नागठाणे येथील कार्यकारी अभियंता अजित ढगाले हे मोर्चेकऱ्यांनी सामोरे गेले.मात्र मोर्चेकऱ्यांच्या मागणीबाबत कार्यवाही करण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्याने मोर्चेकऱ्यानी गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू करत जोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची तोडलेली वीज कनेक्शन तात्काळ जोडली जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.सुमारे पाच तास शेतकरी गेटवर आंदोलन करत होते. अखेर सायंकाळी सपोनि डॉ. सागर वाघ यांनी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना बोरगाव पोलीस ठाण्यात आणले. आक्रोश मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ससपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी ही आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीची पहाणी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या चुकीच्या विजबिलासंदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण समिती यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकारी हे या मंचचे न्याय दंडाधिकारी आहेत.त्यांच्या न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असतानाच वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांची शेतीची वीज कनेक्शन कट करून एकप्रकारे न्यायालयाचा अवमानच केला आहे. वीज वितरण कंपनीने आंदोलक शेतकऱ्यांचे कोणतीही मागणी मान्य न करता पोलीस बळ वापरून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता हे शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल आणि त्याला सर्वस्वी वीज वितरण कंपनीच जबाबदार राहील.
खा.उदयनराजे भोसले यांचाही आंदोलनाला पाठींबा
गणेशवाडी येथे वीज वितरण कंपणीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनास जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ खात्याचे सभापती सुनील काटकर यांनी भेट दिली.यावेळी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला खा.उदयनराजे भोसले यांचा पाठींबा असल्याचे त्यांनी उपस्थित आंदोलकाना सांगितले.