पीक नुकसानीचे तत्काळ पंचनाम्यांच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; जिल्हा कृषी अधीक्षकांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली, यात रब्बीतील पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी आता आक्रमक झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करत आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये सडलेली फळे फेकून आणि खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध आंदोलन केले आहे.

परभणी जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे गहू , हरबरा व ज्वारी पिकासोबत, फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये विशेष करून मांडाखळी आणि परभणी तालुक्यातील काही भागात तर, फळबागा अक्षरशः उध्वस्त झाल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. यासंदर्भात कृषी विभाग बघ्याची भूमिका घेत असून नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तत्काळ पंचनामे करावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय मध्ये नुकसानग्रस्त फळे खुर्ची व टेबलवर फेकून देण्यात आली. तर कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला यावेळी चपलांचा हार घालत हे आंदोलन करण्यात आले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment