स्वाभिमानीचा इशारा : चार दिवसात एकरकमी एफआरपी जाहीर करा, अन्यथा कारखाने बंद पाडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडूज | खटाव तालुक्यातील घाटमाथ्याचा वर्धन शुगर आणि पडळच्या खटाव माण सहकारी कारखान्यांनी 2021 च्या गळीत हंगामासाठी उसाची पहिली उचल जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. गोपूजच्या ग्रीन पॉवर शुगर कारखान्याने बॉयलर पेटवला आहे. मात्र गेल्या वर्षीची एफआरपी अजून दिलेली नाही. या आणि इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या कारखान्यावर मोटर सायकल रॅली काढली. पडळ, दातेवाडी, धोंडेवाडी, अंबवडे, गुरसाळे गोपूज, औंध आणि घाटमाथा या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली.

सन 2021- 2022चा गळीत हंगामातील एफआरपीचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र सुरू आहे. तीन तुकड्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामूळे एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे ही भूमिका स्वाभिमानीने गटाने तीनही साखर कारखाना व्यवस्थापनासमोर मांडली. एफआरपी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची, एकरकमी घेतल्याशिवाय सोडणार नाही, एकाच गट्टी राजू शेट्टी या आणि इतर घोषणांनी कारखाना परिसर दणाणून गेला होता. येत्या दोन दिवसात एफआरपीची घोषणा करू असे आश्वासन पडळ कारखाना व्यवस्थापनाने दिले. तर शनिवारपर्यंत मागील थकबाकी जमा करू आणि मगच कारखाना सुरू करू, अशी भूमिका गोपूज कारखान्याने मांडली. इतर कारखान्याबरोबर वर्धन शुगर पहिल्या उचलीची घोषणा करेल असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले. साखर कारखान्याकडून वजनात काटामारी होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. वजन करून आणलेला ऊस गाळपासाठी घेतला जात नाही. शेतकऱ्यांनी वजन करून आणलेले वाहन गाळप करण्यासाठी उतरून घेतले पाहिजे. वजनामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. वजनातील काटामारी थांबली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावर्षी साखर उद्योग तेजीत असताना आहे त्यामुळे गेल्या हंगामातील अंतिम बिल 150 रुपये द्यावे आणि एकरकमी एफआरपी द्यावी तुकड्यातील एफआरपी स्वीकारली जाणार नाही, अन्यथा कारखाने बंद पाडू असा इशारा संघटनेने दिला आहे.

त्याशिवाय उसतोडीसाठी खुशालीच्या नावाखाली तोडणीवाले ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून प्रति एकर सध्या 5 ते 10 हजार रुपयांची मागणी करतायत.हे पूर्णपणे थांबले पाहिजे, त्यामुळे शेतीअधिकारी चिटबॉय, मुकादम आणि मजुरांना स्पष्ट कल्पना देणें शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जाऊ नयेत. कोणी पैसे मागितले त्याला बदडून काढले जाईल तसेच खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, याची या व्यवस्थापणाने नोंद घ्यावी. असा इशारा संघटनेने दिला आहे.यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी चितळी, विखळे, कांनकात्रे, अँभेरी, बनपुरी, कातरखटाव भुरकवडी सह अनेक गावातील ऊस उत्पादक उपस्थित होते. संघटनेचे प्रवक्ते अनिल पवार, सूर्यकांत भुजबळ, जिल्हाध्यक्ष श्रीकांत लावंड, युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे देशमुख, अँड. प्रमोद देवकर,सचिन पवार, अजय पाटील यांच्यासह अनेक पदा धिकारी उपस्थित होते.

Leave a Comment