हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना नंतर आता पुण्यात स्वाईन फ्लू ने डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसांत ही रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. 1 जानेवारी ते 1 ऑगस्ट पर्यंत स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या 129 होती. मात्र त्यानंतर 5 ऑगस्ट पर्यंत हीच रुग्णसंख्या 260 झाल्याने चिंता वाढली आहे.अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संक्रमणाचे मुख्य कारण म्हणजे गर्दी आणि एकमेकांशी वाढलेला संपर्क. ताप आणि धाप लागणे यासारखी लक्षणे असलेल्या लोकांची संख्या सध्या 377 वर आहे. 5 ऑगस्टपर्यंत 200 जणांवर स्वाईन फ्लू (H1N1) संसर्गावर उपचार सुरू होते. त्यापैकी 35 संशयित तर 165 पॉझिटिव्ह आढळले. 1 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 129 होती, तोपर्यंत आठ मृत्यूही झाले होते. शुक्रवार, 5 ऑगस्टपर्यंत पुणे महापालिका हद्दीतील या प्राणघातक विषाणूमुळे मृतांची संख्या 10 वर पोहोचली आहे.
व्हेंटिलेटरवर असलेल्या H1N1 रुग्णांची संख्याही वाढल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. एक ऑगस्ट रोजी आठ गंभीर रुग्ण होते. परंतु 5 ऑगस्टपर्यंत हि संख्या 14 पर्यंत वाढली. इथून पुढे अनेक सण समोर असताना स्वाईन फ्लूचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून गर्दीत आपला जीव गमावू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.