बीड प्रतिनिधी । आपल्या धडाकेबाज प्रचाराने आपल्या प्रशासकीय विभागासह महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंना मागील महिनाभरात महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. प्रचार दौऱ्यांचं व्यस्त वेळापत्रक पाहता तब्येतीकडं थोडंफार दुर्लक्ष होणं साहजिक होतं. याचाच प्रत्यय आज पंकजा मुंडेंना आला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा घेतानाच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना चक्कर आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळाली. जवळपास १० मिनिटे बेशुद्धावस्थेत असल्याने उपस्थित लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पहायला मिळालं. हातातील कापड, ओढणी, रुमाल फिरवून पंकजा मुंडेंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत होते.
अखेर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसहित पंकजा मुंडेंनीही सुटकेचा निश्वास टाकल्याचं पहायला मिळालं. दरम्यान भाजप नेते नितीन गडकरींनाही अशाच प्रकारची भोवळ मागील वर्षभरात दोन ते तीन वेळा आल्याचं निदर्शनास आलं होतं. पंकजा मुंडे यांना नक्की कशामुळे भोवळ आली हे अद्यापही समजू शकलं नाही.