हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागाव- वनवासमाची गावच्या हद्दीत बांधण्यात येत असलेल्या मोरीत काल शुक्रवारी सकाळी अर्धवट जाळण्यात आलेल्या मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या घटनेनंतर तळबीड पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. या मृतदेह जळीत प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास केला जात असून संशयित लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल शुक्रवार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वनवसमाची गावच्या हद्दीत मोरीत अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पुरूष जातीचा मृतदेह जाळण्यात आल्याने घातपाताचा प्रकार झाल्याचे समोर आले होते. या घडलेल्या घटनेवरून दोन दिवसांपूर्वी तरूणाचा खून करून मृतदेह वाहनातून आणून जाळण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला असल्याच्या संशयावरून तळबीड पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. मृतदेहाशेजारी आढळून आलेल्या पुरूषाच्या चप्पला, देशी दारूची मोकळी बाटली आणि काडी पेटी वरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आहेत. खून झालेला तरूण हा कर्नाटकातील असल्याचे निष्पन्न होत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा छडा लावून लवकरच याप्रकरणातील संशयितांना गजाआड करण्यात पोलिसांना यश येण्याची शक्यता आहे.