काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे, ती भारताविरुद्ध सीमापार चकमकींमध्ये वापरली जाऊ शकतात. मात्र, तालिबानने सातत्याने ते चांगले तालिबान असल्याचा आग्रह धरला आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेची बरीच शस्त्रे तिथेच शिल्लक होती. यातील बहुतांश शस्त्रे डिसेबल करण्यात आली आहेत. मात्र काही शस्त्रे अजूनही काम करू शकतात. काबूल ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेची ही शस्त्रे तालिबानच्या हाती लागली.
वृत्तानुसार, अफगाण शस्त्र विक्रेते ही शस्त्रे तालिबान्यांकडून विकत घेत आहेत आणि पाक-अफगाण सीमेवरील दुकानांमध्ये त्यांची खुलेआम विक्री करत आहेत. अफगाणिस्तानातून पाकिस्तानात फळे आणि भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून या शस्त्रांची तस्करी केली जाते आहे.
अफगाणिस्तानातूनही पाकिस्तानमार्गे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमली पदार्थांची वाहतूक केली जाते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुमारे 2400 किमीची सीमा आहे, तेथून खैबर पख्तुनख्वामध्ये ड्रग्जची वाहतूक केली जाते. येथून ड्रग्ज लाहोर आणि फैसलाबाद येथे नेले जाते. त्यानंतर त्यांची मोठी खेप कराचीमार्गे दक्षिण आशियातील बाजारपेठेत पोहोचते.