आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भाग असून प्रतिवर्षी येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला प्रतिवर्षी अतिवृष्टीच्या काळात आपत्तीचा सामना करावा लागतो. आपत्ती आलेनंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना करणेकरीता आपत्तीच्या काळात तालुका प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा करु नये, जागृत रहावे, अशा सुचना माजी गृह राज्यमंत्री, आ. शंभूराज देसाई यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या.

दौलतनगर (ता. पाटण) येथे आ. शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात तालुका प्रशासनाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील गाडे, कराडचे उत्तम दिघे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, कराडचे डॉ. रणजित पाटील, तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी शेलार, कराडच्या मीना साळूंखे, मराविमचे शिंदे,आदमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील, विद्याधर शिंदे, चौधरी, जिल्हा परिषद बांधकामचे संदिप पाटील, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता बसुगडे यांचेसह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

आ. शंभूराज देसाई म्हणाले, गेली दोन ते तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले असून तालुक्यातील विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अतिवृष्टीच्या काळात रस्ता बंद होऊन दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जेसीबी मशीन व पोकलॅन मशीन उपलब्ध कराव्यात व आपली यंत्रणा सतर्क ठेवावी. गट शिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शाळांचे पाहणी करुन आपत्तीकाळात प्राथमिक शाळेतील विद्यार्थी यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच तात्पुरता निवा-याकरीता शाळा सुस्थितीत आहेत का ते पहावे. कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिका-यांकडून मान्सून काळात पडणा-या पावसामुळे कोयना धरणात होणा-या पाणीसाठयासंदर्भात सविस्तर माहिती घेवून कोयना धरण व्यवस्थापनाने योग्य नियोजन करावे. कोयना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या गावांनी अतिवृष्टीच्या काळात सतर्क रहावे. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी औषधसाठा किती उपलब्ध आहे, याची माहिती घ्यावी. आरोग्य विभागाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य नियोजन करावे.

आपत्ती काळात रुग्णवाहिकेची व्यवस्था तात्काळ कशी होईल, याची दक्षता घ्यावी. विद्युत विभागाने आपत्कालीन टिम तयार करुन दक्ष आणि जागृत राहून विद्युत पुरवठा सुरळीत कसा राहिल याची दक्षता घ्यावी.  तसेच पाणी पुरवठा विभागाने अतिवृष्टीच्या दरम्यान नदीकाठचे व डोंगर भागातील पिण्याच्या पाण्याचे उदभव  व विहीरी पाण्याखाली गेल्यास टॅकरची व्यवस्था करुन पाणी पुरवठा करावा. तसेच पाटणमधील अतिक्रमणामुळे उदभवणा-या विशेषत: पाटण बसस्थान परिसरातील पुरस्थितीबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सुचना पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना केल्या. दरम्यान गेल्या वर्षी याच जुलै महिन्यातील ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषत: भूस्खलन झालेल्या अनेक गावांतील वाडीवस्त्यांवरील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागले होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक विभागातील तालुकास्तरीय अधिकारी यांनी सतर्क राहण्याच्या सुचना शेवटी केल्या.

Leave a Comment