खराब रस्त्यामुळे टायर फुटल्याने ट्रक उलटला ; पाच वर्षात 30 जणांचा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : तासगाव – कवठे महाकाळ राज्य महामार्गावर मणेराजूरी पवार वस्तीजवळील वळणावर खराब रस्त्यामुळे टायर फुटून आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या राज्यमार्गावर रखडलेल्या दीड किलोमीटर रस्त्यावर तीन धोकादायक वळणे आहेत. यामध्ये पडून गेल्या पाच वर्षात पंचवीस ते तीस जणांचा बळी गेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजापूरहून तुरीचे भुसकाटाची पोती घेऊन टाटा आयशर ट्र्क (क्र. केए 57 सी 4556) हा तासगावकडे निघाला होता. तो कवठेएकंद येथे पोती उतरणार होता. परंतु पवार वस्तीजवळील वळणार ट्र्क आला असता त्यातील चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. यामध्ये ट्र्क पलटी झाला. या अपघातात ट्र्क चालक अब्दुल मुल्ला हा सुदैवाने बचावला.

ज्यावेळी ट्रकचा हा अपघात झाला. त्यावेळी ट्रकचे टायर फुटून गेले. या अपघातात सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे. या अगोदर याच वळणावर फरशीचा ट्रक उलटून दहा जणांचे बळी गेले होते. तर मोटारसायकल व इतर अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.

तासगाव – कवठेमहांकाळ राज्य महामार्गाचे सुमारे तीन वर्षांपूर्वी काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, मणेराजूरी जवळील खंडोबा ओढा ते पवार वस्ती पर्यंतचा दीड किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. त्यामुळे रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे. आणखी किती बळी व नुकसान झाल्यावर प्रशासन जागे होणार? असा प्रश्न वाहनधारक व ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment