सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
गव्हाण येथील रुग्णाच्या रुपाने कोरोनाने तासगाव तालुक्यात प्रवेश केला आहे. यानंतर प्रशासनाने गव्हाण गावठाण १४ दिवसासाठी ” बफर झोन ” ठेवण्याचा निर्णय घेतला. गावाकडे येणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात ठाण मांडून सर्व्हे करत आहेत. अशी माहिती तहसिलदार कल्पना ढवळे यांनी दिली आहे.
दहा दिवसापुर्वी गव्हाण येथील एकजण मिनीबसने अहमदाबाद येथून गावी आला होता. त्याला संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतू याच मिनीबस मधून आलेल्या साळशिंगे येथील महिलेचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल सुर्यवंशी यांनी या व्यक्तिला आयसोलेशन मध्ये पाठवले होते. बुधवारी त्याचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटिव्ह आला. तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे हे समजताच बुधवारी रात्री उशीरा तहसिलदार कल्पना ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अनिल सुर्यवंशी यांनी गव्हाण येथे भेट दिली. तातडीने गाव बंद करण्याचे आदेश दिले.
तसेच कोरोनाबाधित व्यक्तिच्या सहवासात आलेल्या व्यक्तिंची माहिती घेऊन त्यांचाही शोध सुरु केला. गुरुवारी सकाळी गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. पोलिस उपअधिक्षक अंकुश इंगळे आणि तासगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी गव्हाण येथे भेट दिली. गावालगत सेवाश्रम विद्यालयातील संस्था क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तिंची माहिती घेतली. गावामध्ये येणा-या सर्व रस्त्यांवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”