हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर गोवरचा कहर वाढला असून त्याच पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची 11 सदस्यीय टीम राज्यात स्थापन होणार आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना याबाबत निर्देश दिले आहेत. यापूर्वी कोरोना काळात टास्क फोर्सने रुग्णसंख्येवर लक्ष्य ठेवलं होत तसेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या त्याच प्रमाणे आता गोवरच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना होणार आहे.
टास्क फोर्सकडून गोवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करणे आदी बाबींवर लक्ष दिले जाणार आहे. या समितीत ११ तज्ज्ञ डॉक्टर आहेत. आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. टास्क फोर्सच्या माध्यमातून वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
गोवर हा साथीचा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. जर गोवर आजाराची लागण झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यामधून बाहेर येणार विषाणू हवेत पसरतात आणि संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला गोवर आजार होऊ शकतो. खास करून लहान मुलांमध्ये गोवरचे प्रमाण सर्वाधिक आहे. गोवर झालेल्या लहान मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणं, अंग दुखणं, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणं दिसून येतात. त्यानंतर 5 ते 7 दिवसांत शरीरावर लालसर पुरळ येतं. कधीकधी तोंडातही पांढरे डाग दिसतात.