कराड | उंब्रज (ता. कराड) येथील मुख्याध्यापिका व सहशिक्षक लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. उज्ज्वला रघुनाथ पोळ-शेलार (वय- 56, रा शहापूर, ता. कराड), बापू सर्जेराव सूर्यवंशी (वय- 50, रा. भुयाचीवाडी, पो. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की उंब्रज येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेची शिक्षण विभागातर्फे वार्षिक तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शाळेला चांगला शेरा देण्यासाठी वार्षिक तपासणी टिमच्या सदस्यांना देण्यासाठी व तपासणी टिममधील सदस्यांवर करण्यात आलेल्या खर्चापोटी वाट्याला आलेली 1 हजार 875 रुपयांची रक्कम मुख्याध्यापिका उज्ज्वला पोळ यांनी तक्रारदार यांना मागितली होती. या वेळी तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत विभागाला याची माहिती दिली.
लाचलुचपत विभागाने खातरजमा करून बुधवारी सापळा रचला या वेळी सहशिक्षक बापू सूर्यवंशी याला लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल अरुण वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नीलेश चव्हाण, प्रशांत नलावडे, पोलिस कॉन्स्टेबल तुषार भोसले, स्नेहल गुरव, चालक मारुती अडागळे या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले