जिल्ह्यातील शाळा बंद असल्याने शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’

जि.प. प्राथमिक विभागाच्या सूचना

औरंगाबाद : राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लादण्यात आलेले असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता ‘वर्क फ्रॉम होम’ची परवानगी देण्यात आली आहे. परंतु परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,  अशा सूचना जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जायस्वाल व डॉ. बी. बी. चव्हाण यांनी नुकत्याच दिल्या आहेत.

 

जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी औरंगाबाद जिल्ह्यासाठी सविस्तर निर्देश जारी केलेले आहेत. जिल्ह्यातील कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांना सर्वेक्षण,  लसीकरण,  डाटा एंट्री इत्यादी कामांकरिता नियुक्त करण्यात आले आहे. या शिक्षकांनी सर्वेक्षण किंवा कोविड 19 संबंधाने नियुक्ती आदेशात नमूदप्रमाणे कर्तव्य पार पाडावे. याप्रकारे नियुक्त शिक्षक वगळता उर्वरित शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात येत आहे. परंतु शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणे, निकाल तयार करणे इत्यादी अनुषंगिक कर्तव्ये पार पाडणे सर्व शिक्षकांना बंधनकारक राहील, असे शिक्षणाधिकारी जायस्वाल यांना म्हटले आहे.

 

ब्रेक द चेन कालावधीत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद राहतील. तथापि या नियमातून 10 वी, 12 वीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट असेल.  परीक्षा घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणे किंवा 48 तासांपर्यंत वैध असलेले कोरोना निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील कोविड -19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्याही वेळी सर्वेक्षण,  लसीकरण,  डाटा एंट्री इत्यादी अनुषंगिक कामांकरिता शिक्षकांना नव्याने नियुक्ती करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होमची परवानगी देण्यात आली असली तरी सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही,  असे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जायस्वाल,  माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like