हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठे विधान केले आहे. विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या संथ गतीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सोबतच सर्व फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करण्या ऐवजी जास्त धावा करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजांना अत्यंत बचावात्मक वृत्ती सोडण्याचे आवाहन केले होते.विराटच्या मते परदेशी दौर्यामध्ये अशा खेळाने कधीही फायदा होणार नाही. बेसिन रिझर्व्ह येथे पहिल्या कसोटी सामन्यात भारताला १० विकेट राखून पराभव स्वीकारावा लागला. वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाला दोन्ही डावांमध्ये २०० धावांचा टप्पा सुद्धा गाठता आला नाही.
पराभवानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला, ‘माझ्यामते फलंदाजी युनिट म्हणून आम्ही वापरत असलेलं खेळण्याच्या तंत्रात दुरुस्ती करावी लागेल. मला वाटत नाही की, फलंदाजी करतांना बचावात्मक खेळ केल्यानं जास्त फायदा मिळेलच म्हणून. अशा परिस्थितीत आपण आपले शॉट्स खेळू शकणार नाही.’ दुसर्या डावात तांत्रिकदृष्ट्या अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अत्यंत बचावात्मक दृष्टीकोन स्वीकारत ८१ चेंडूत ११ धावा केल्या. तर हनुमा विहारीने ७९ चेंडूत खेळत १५ धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीत फलंदाजांच्या फळीतील कोणत्याही खेळाडूला फलंदाजीचा सूर गवसला नाही.
२८ चेंडूत पुजाराला एकही धाव काढता आली नाही. अशा परिस्थितीत दुसर्या टोकाला उभ्या असलेल्या मयंक अग्रवालला सैल फटके मारायला भाग पडले. धावून एक-एक धाव काढण्याऐवजी जोपर्यंत चांगला चेंडू येत नाही तोपर्यंत धावा काढायच्या नाही अशा खेळाच्या शैलीला भारतीय कर्णधार कोहलीचा पूर्णपणे विरोध आहे. कोहलीच्या मते कदाचित चांगल्या चेंडूची वाट पाहत असताना अशाच एका चांगल्या चेंडूवर तुमची विकेट सुद्धा जाण्याची शक्यता कायम असते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.