सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा सामना कोणाकोणाशी? पहा संपूर्ण शेड्युल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने (Team India) अगदी दिमाखात सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. भारताने आधी आयर्लंड, नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आणि त्यानंतर यजमान अमेरिकेचा पराभव केला, तर कॅनडा विरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. आता सुपर ८ कडे सर्वांच्या नजरा लागल्या असून भारताची खरी कसोटी इथेच पाहायला मिळेल. सुपर ८ मध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील एका सोबत असेल. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला सुपर ८ मध्ये २ सामने जिंकणे तरी आवश्यक आहे.

कधी होणार सुपर-८ चे सामने

सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. हा सामना 20 जून रोजी बार्बाडोसमध्ये होणार आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना २२ जून रोजी बांगलादेश किंवा नेदरलँड यांच्यातील एका संघाविरुद्ध होईल. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवण्यात येईल तर भारतीय संघाचा तिसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा सामना 24 जुनला सेंट लुसिया येथे होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टीम इंडियाचे सुपर ८ मधील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवण्यात येतील त्यामुळे चाहते टीव्ही वर सुद्धा आरामात हे सर्व सामने पाहू शकतील.

ऑस्ट्रेलियाचा संघ तर मजबूत आहेच, अनेकदा भारतीय चाहत्यांचे मन ऑस्ट्रेलियामुळेच तुटलं आहे. परंतु भारतीय संघाला अफगाणिस्तान विरुद्ध सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. कारण अफगाणिस्तानने साखळी फेरीत न्यूझीलंडला पराभवाचा हादरा देत वर्ल्डकप मधूनच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ सुपर ८ मध्ये आला तर भारताला त्यांच्यापासूनही सावध राहावं लागेल. एकूणच काय तर इथून पुढे रोहित सेनेला अतिशय चांगला खेळ दाखवत सेमी फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी अथक परिश्रम करावं लागेल.

भारताने साखळी फेरीतील सर्व सामने आरामात जिंकले असले तरी विराट कोहलीचा खराब फॉर्म टीम इंडिया साठी चिंतेचा विषय बनला आहे. कोहली या विश्वचषक स्पर्धेत रोहित सोबत सलामीला येत आहे. मात्र अपेक्षित धावा त्याच्या बॅट मधून निघाल्या नाहीत. पहिल्या तिन्ही सामन्यात कोहलीने चाहत्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आयर्लंडविरुद्ध विराट कोहली 5 चेंडूत 1 धावा काढून बाद झाला. यानंतर पाकिस्तानविरुद्ध 3 चेंडूत 4 धावा आणि अमेरिकेविरुद्ध तर त्याला खातं सुद्धा खोलता आलं नाही. म्हणजेच आतापर्यंत विराट कोहलीला T20 विश्वचषकातील 3 सामन्यांत केवळ 5 धावा करता आल्या आहेत. विराट कोहलीच्या या सुमार फॉर्ममुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. भारताने आत्तापर्यतचे सर्व सामने गोलंदाजांच्या जीवावरच जिंकले आहेत, त्यामुळे आता सुपर ८ मध्ये कोणत्याही परिस्थितीत कोहलीसह इतर भारतीय फलंदाजांना सुद्धा आपला दम दाखवावा लागणार आहे.