तहसिलदारांची दुचाकीवरून मोहिम फत्ते : चार ठिकाणी धाडी, एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकीसह वाळूसाठे जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव | खटाव तालुक्यात चार ठिकाणी तहसीलदार किरण जमदाडे यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापे टाकले. या कारवाईत एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर, दोन दुचाकी, वाळू साठे ताब्यात घेण्यात आले. तहसीलदार जमदाडे यांनी एकाच दिवसात चार ठिकाणी छापे टाकून वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी तहसिलदार किरण जमदाडे यांनी आपल्या कारवाईचा फंडा बदलत चक्क मोटार सायकलवरून जावून त्याठिकाणी धाडी टाकल्या अन् मोहिम फत्ते झाली.

तालुक्यातील काही भागांत अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार श्री. जमदाडे यांना मिळाली. त्यानुसार तहसीलदार जमदाडे यांनी बुधवारी (ता. नऊ) दिवसा व रात्री त्याठिकाणी जाऊन ही कारवाई केली आहे. बुधवारी दिवसभरात भुरकवडी, वाकेश्वर, वडूज याठिकाणी छापे टाकले, तर मध्यरात्री कळंबी येथे गौण खनिजा अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ठिकाणी छापा टाकला. भुरकवडी येथील फडतरे शिवारात ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची वाहतूक होत होती. त्याठिकाणी ट्रॅक्टर (एमएच ११ सीएच ०८०१) हा अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. हा ट्रॅक्टर विशाल सयाजी कदम यांच्या मालकीचा असून, तो जप्त करण्यात आला आहे. वडूज हद्दीत सर्व्हे क्रमांक ६५६ मध्ये धोंडिराम सीताराम फडतरे यांच्या मालकीच्या जागेत दोन ठिकाणी सहा ब्रास वाळू साठा जप्त केला. वाकेश्वर येथे येरळा नदीपात्रात गट क्रमांक ५६३ मध्ये शशिकांत निवृत्ती फडतरे, विठ्ठल कोंडी फडतरे व अन्य लोकांच्या मालकीच्या हद्दीत पाच फूट मातीचा थर उत्खनन करून त्याखालील ३५ ते ४० ब्रास वाळूची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले. याठिकाणचा पंचनामा करण्यात आला आहे. कळंबी- येळीव रस्त्यालगत मध्यरात्री एक वाजता गट क्रमांक २३९ मध्ये विहिरीशेजारील अवैध दगड वाहतूक करणारा देवदास यादव यांच्या मालकीचा जेसीबी (एमएच ११ सीडब्लू ०२४१ ) ताब्यात घेतला, तसेच याठिकाणी रत्नकल्याण घाडगे, सूर्यकांत यादव यांच्या मालकीचे ट्रॅक्टरह ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तलाठी सुनील सत्रे, निनाद जाधव, अक्षय साळुंखे, गणेश राजमाने, कोतवाल सचिन वाघमारे सहभागी झाले होते. तहसीलदार श्री. जमदाडे यांनी एकाच रात्रीत तालुक्यात विविध भागांत छापे टाकून केलेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Comment