इस्लामाबाद । भारताने गणेश मंदिर पाडण्याबाबत कडकपणा दाखवल्यानंतर पाकिस्तान बॅकफूटवर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने या विषयावर ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे कि,” भोंगच्या गणेश मंदिरावरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. मी पंजाब पोलिस महानिरीक्षकांना सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश आधीच दिले आहेत. तसेच पोलिसांच्या निष्काळजीपणावरही कडक कारवाई झाली पाहिजे. सरकारकडून मंदिराची पुनर्बांधणीही केली जाईल.”
यापूर्वी भारताने या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गुरुवारी एका गणेश मंदिराच्या तोडफोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताने या घटनेबाबत आपली भूमिका कठोर केली आहे आणि पाकिस्तान उच्चायुक्ताच्या प्रभारींना बोलावून याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की,”पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारताने पाकिस्तानी राजनायकाकडे गंभीर चिंता व्यक्त केली.”
तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, काही लोकं लाठ्या आणि काठ्या घेऊन मंदिरात प्रवेश करत आहेत आणि मूर्ती तोडत आहेत. या लोकांनी मंदिराच्या इतर ठिकाणांचेही नुकसान केले आहे. या घटनेनंतर परिसरातील पोलिसांनी मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात केली आहेत.
इम्रान खानच्या पक्षाचे हिंदू खासदार रमेश वंकवानी यांनी भोंग शरीफच्या गणेश मंदिरातील तोडफोड आणि हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “दोषींना अटक करून कठोर शिक्षा केली पाहिजे.”