हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिद्द आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे एकदा ठरवले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील एका टेम्पो चालकाच्या मुलाने. त्याने सलग दुसऱ्यांदा MPSC राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी एमपीएससीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्यानंतर यावर्षीही सांगलीच्या प्रमोद चौगुले याने 633 मार्कांसह राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. पाहू या त्याच्या जिद्दीची यशोगाथा….
MPSC राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत सांगलीच्या प्रमोद चौगुलेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. मूळच्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी गावच्या मराठी तरुणाने मिळवलेले यश हे नक्की प्रेरणादायी आहे.
पुरात घर गेलं वाहून तरीही जिद्द हरला नाही
सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचे संपूर्ण घर वाहून गेले होते. त्याचबरोबर कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनाने गाठले होते. मात्र, या कठीण परिस्थितीत प्रमोद खचले नाही. त्यांनी त्यातून मार्ग काढत MPSC परीक्षेत बाजी मारली. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि त्यांनी हे लक्षणीय यश मिळवलं.
वडील टेम्पो चालक तर आईच टेलरिंग
प्रमोद यांनी खूप मेहनतीने कठोर अभ्यास करून यश खेचून आणले आहे. प्रमोद विवाहित असून त्यांना एक मुलगी देखील आहे. शिवाय प्रमोद यांचे वडील टेम्पो चालक आहे तर आई टेलरिंगचं काम करते. घरची परिस्थिती तशी चांगली असल्यामुळे प्रमोद अनेक वर्षांपासून MPSC आणि UPSC ची तयारी करत होते. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. अखेर मागच्या वर्षी आणि आता पुन्हा एकदा त्यांनी एमपीएससी मध्ये बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी असून MPSC ची तयारी
प्रमोद यांचं प्राथमिक शिक्षण हे सोनी गावातच झालं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालं. यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. मात्र, त्यांना आधीपासूनच MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात केली. तसंच प्रमोद हे आपल्या पत्नीला आणि मुलीला सोडून पुण्यात MPSC च्या तयारीसाठी राहत होते.
पदांअभावी दिली दुसऱ्यांदा परीक्षा
आता प्रमोद चौगुले यांनी २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत मजल मारली. केवळ एका गुणामुळे ते गुणवत्ता यादीत येऊ शकले नाहीत. तरीही त्यांनी न खचता पुन्हा एकदा तयारी सुरू केली. त्यानंतर खूप अभ्यास करून राज्यसेवा परीक्षेच्या २०२० च्या निकालात प्रथम आले. मात्र, पोलिस उपअधीक्षक आणि उपजिल्हाधिकारी ही पदे तेव्हा उपलब्ध नसल्याने, त्यांनी परत तयारी करून राज्यसेवा २०२१ परीक्षा दिली. आता पुन्हा या परीक्षेत राज्यातून पहिले आले आहे.