कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील विंग येथे शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने ऊद मांजराची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाने तब्बल दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत बबन बापू देशमुख (वय 40), गणेश किसन पवार (20), बाळू काळू जाधव (45), पोपट अप्पा देशमुख (40), राहुल शिवाजी पवार (23), सुनील राजाराम देशमुख (25), अजय राजाराम देशमुख (23), शिवाजी बापू देशमुख (38), रघुनाथ अण्णा देशमुख (37), राजाराम बापू देशमुख (45, सर्व रा. ओंड, ता. कराड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी, विंग गावच्या शिवारात उसाच्या शेतामध्ये काही जण शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने शिकार करीत असल्याची माहिती रविवारी वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार सहायक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, अरुण साळुंखे, सुनीता जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी भेट दिली.
त्यावेळी दहा ते बारा जण सात शिकारी कुत्र्यांसह शिकार करीत असल्याचे दिसून आले. अधिकारी व कर्मचार्यांनी संबंधितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये दोन ऊद मांजर मृतावस्थेत आढळून आले. संबंधितांनी ऊद मांजराची शिकार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा