हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; चार ठार तर 24 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोडजवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर व बसच्या विचित्र अपघातात चार जण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

याविषयी अधिक वृत्त असे की, एम एच 38 एफ 8485 ही खाजगी बस नांदेडहून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत असताना ट्रक आरजे 02 जीबी-3945 या नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकची धडक बसली. पार्डी वळणाजवळ एका उभ्या ट्रकला चूकविण्याच्या प्रयत्नात कंटनेरची बसला समोरासमोर धडक बसली. या धडकेत खाजगी बसमधील 4 प्रवासी ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच कळमनुरीचे पोलीस कर्मचारी दादासाहेब कांबळे, शशिकांत भिसे, जगन पवार, अरविंद राठोड, शिवाजी देमगुंडे हे घटनास्थळी गेले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यावरच असल्यामुळे क्रेन आणून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला काढली. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. या भीषण अपघाताची माहिती मिळताची कळमनुरीतील अनेकांनी घटनास्थळ गाठले. जखमी व मयतांना रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात हलविले. कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची एकच गर्दी झाली होती. त्यानंतर गंभीर जखमींना हिंगोलीला हलविले. हिंगोली येथे जिल्हा रुग्णालयातही मोठी गर्दी झाली होती.

Leave a Comment