सांगली | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पवार कुटुंबीय मुलाने नविन घेतलेल्या गाडीतून देवदर्शनाला निघाले होते. तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेवून कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला जाताना चारचाकी कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठिमागून भीषण धडक दिली. या धडकेत वडिल आणि अन्य एकजण जागीत ठार झाले तर आई- व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यात रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यानजीक पेट्रोलपंपासमोर मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघतात माण तालुक्यातील पवार कुटूंबीय कारने (क्र. एम. एच. 11 ए. 7658) देवदर्शनासाठी निघाले होते. नागज फाट्याजवळील गणेश पेट्रोलपंपाजवळ कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे या कारची थांबलेल्या ट्रकच्या मागील बाजूस जोरात धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता.
या अपघातात कारच्या डाव्या बाजूला बसलेले आनंदराव शिवराम पवार (वय- 68) व माणिकराव साहेबराव पवार (वय- 54) हे जागीच ठार झाले. उषाताई आनंदराव पवार (वय- 60) व कारचालक स्वप्निल आनंदराव पवार (वय- 25, सर्वजण कळसकरवाडी, ता. माण, जि. सातारा) हे जखमी झाले. जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे, विनोद चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.