हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून विद्येचं माहेरघर मानलं जाणाऱ्या पुण्यात कोयत्याने दहशत माजवली आहे. अनेक ठिकाणी कोयत्याच्या मदतीने गाड्यांची तोडफोड केल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. आता तर एका तरुणाने चक्क कॉलेजमध्येच कोयता काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. कुणाल कानगुडे असं या तरुणाचे नाव असून तो १९ वर्षाचा आहे. पोलिसांनी या प्रकारानंतर तात्काळ त्याला ताब्यात घेतलं. येव्हडच नव्हे तर कॉलेज परिसरात या तरुणाची दिंडंही काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, काही दिवसांपूर्वी कुणाल कानगुडे याचा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये आपली दहशत राहावी तसेच काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली. पोलिसांना या संपूर्ण प्रकारची माहिती मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि डेक्कन परिसरात त्याची दिंड काढली.
दरम्यान, पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली होती, अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने तरूणीवर कोयता हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ती घटना अजूनही ताजी असताना आता एका तरूणाने कॉलेजमध्ये कोयता काढल्याची घटना समोर आल्याने पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झालाय.