हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आणि फुलेही वाहिली. आंबेडकर यांच्या या कृतीने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र कोंडी झाली आहे. भाजपने सुद्धा या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत भूमिका काय आहे असा थेट सवाल करत आहे. या सर्व प्रकरणानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया आली आहे.
प्रकाश आंबेडकर हे वंचितचे नेते आहेत, त्यांचा पक्ष वेगळा आहे. औरंगजेबाच्या मजारीवर ते गेले हा वंचित बहुजन आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्याशी आमचं काही घेणंदेणं नाही, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाने हात झटकल्याचे दिसत आहे.
दरम्यान, आज वरळीत ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर आहे. या मेळाव्याला स्वतः उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. आजच्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? भाजपवर आणि शिंदे गटावर कोणत्या शब्दात निशाणा साधणार? किंवा प्रकाश आंबेडकर औरंगजेब पुढे नतमस्तक झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि शिवसैनिकांचे लक्ष्य लागलं आहे.