हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली असून या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून केली जाणार आहे. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून बहिण- भावाच्या नात्यावरून अजित पवारांना डिवचलं आहे. सरकार कडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? असा सवाल करत सामनातून अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
राज्याचा अर्थसंकल्प पोकळ असला तरी तिन्ही सत्तापक्ष हे आमचेच श्रेय म्हणत एकमेकांना लाथा घालत आहेत. या सर्व योजना जनहिताच्या आहेत, जनतेला थेट लाभ देणाऱ्या आहेत, असा या मंडळींचा कांगावा आहे. त्या खरोखर तशा आहेत का? त्याचा थेट लाभ जनतेला खरंच मिळणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी त्यावरून पोकळ खणखणाट सुरू आहे. मुळात अर्थसंकल्पातील असंख्य घोषणांची अवस्था ‘आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी आहे. राज्यातील निम्म्या जिह्यांमध्ये अद्यापि पाऊस पडलेला नाही; परंतु अर्थसंकल्पात कोरडय़ा घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. थापांचा महापूर आणि खोटय़ा आश्वासनांची अतिवृष्टी करण्यात आली. याच खोटय़ा आणि जुमलेबाज आश्वासनांच्या फुग्यांमध्ये श्रेयाची हवा भरण्याचे उद्योग सत्तापक्षांमध्ये सुरू आहेत.
मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’चा या सरकारला विसर पडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक बहिणींची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या- नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे ‘अनाथ’ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे. असं म्हणत सामनातून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.