.. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळ्यात घुसतील! ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारनं लंडनमधील म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली. पण ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न काही इतिहासकार व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत व या लोकांनी शिवछत्रपतींना वेठीस धरून वाघनखांची जत्रा भरवली आहे. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळय़ात घुसतील! असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

महाराष्ट्रात फसवणुकीचे राजकारण कोणत्या थरापर्यंत पोहोचले आहे त्याचे उदाहरण म्हणजे लंडनहून आणलेली वाघनखे इतिहासकारांची मते वाघनखांच्या बाबतीत वेगळी आहेत व ती समोर आली आहेत, पण इतिहासाशी ‘ओ’ की ‘ठो’ संबंध नसणाऱ्यांच्या हाती राज्याची सूत्रे असल्याने त्यांनी इतिहासाचे विडंबन चालवले आहे. मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी सर्वच बाबतीत इतिहास पुसण्याचे ठरवले आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेत वाघनखांना महत्त्व आहेच, पण चोरांचे सरकार व नकली सरदार म्हणतील तीच वाघनखे खरी हे मान्य करता येणार नाही. मिंधे व फडणवीस या दुकलीने महाराष्ट्राचा इतिहास पिसाळ-खोपडय़ांच्या मानसिकतेने मांडायला घेतला आहे. त्यामुळे त्यांना कावळय़ांना मोर व कोल्हय़ांना वाघ ठरविण्याची घाई झाली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पोटात वाघनखे खुपसल्याने त्यांचे विव्हळणे संपलेले नाही

मुख्यमंत्री मिंधे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वाघनखांचे महत्त्व कसे कळणार ? तर फडणवीस यांची बालबुद्धी ही “विरोधकांची नियत नकली आणि बुद्धीही नकली,” असे म्हणण्यापलीकडे सरकली नाही. मुळात वाघनखे नकली असे कोणीच म्हणत नाही, पण ‘चोरांच्या मनात चांदणे’ तसे मिंधे-फडणवीसांचे झाले आहे! ही वाघनखे खरेच शिवरायांनी वापरलेली आहेत काय? असा प्रश्न इंद्रजित सावंत यांच्यासारख्या इतिहास संशोधकांनी विचारलाव सावंत यांनी त्यांच्या शंकेला पूरक असे पुरावे लोकांसमोर मांडले. त्यात मिंधे-फडणवीस यांना मिरच्या झोंबायचे कारण काय? मुळात ज्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीचरणी गहाण टाकला आहे व जे रोज उठून दिल्लीस मुजरे झाडत आहेत त्यांना शिवरायांच्या वाघनखांची उठाठेव करण्याचा नैतिक अधिकार उरला आहे काय? असा सवाल सामनातून कऱण्यात आला.

मिंधे – फडणवीस, अजित पवार हे नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवराय आणि अमित शहा यांना संभाजीराजे समजत आहेत, पण महाराष्ट्र हा खऱ्या शिवरायांचा भक्त आहे. त्यामुळे गुजरातच्या व्यापारी राज्यकत्यांपुढे तो झुकणार नाही. शिवरायांनी सुरतेवर स्वारी का केली? याचा ज्वलंत इतिहास मिंधे-फडणवीसांनी चाळला पाहिजे. गुजरातचे व्यापारी राज्यकर्ते आज मुंबई-महाराष्ट्र लुटत असताना मिंधे-फडणवीस त्यांच्या बोटांच्या नखांनी साधे डोके खाजवायला तयार नाहीत, तेथे यांनी शिवरायांच्या वाघनखांवर बोलावे हे गमतीतेच आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई गुजरातच्या उद्योगपतींना आंदण दिली जात असतानाही ज्यांच्या बोटांची नखे शिवशिवत नाहीत ते आता वाघनखांवर प्रवचने झोडत आहेत. महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे, मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी ‘वाघनखे’ आणली व त्या वाघनखांसाठी राजकीय जत्रा भरवली. तलवार आणि वाघनखांनी इतिहास घडविला जातो. नुसती तलवार, वाघनखे इतिहास घडवीत नाहीत. तलवारीची मूठ व वाघनखे ज्याच्या हाती ती मूठ, तो हात इतिहास घडवतो. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत व या लोकांनी शिवछत्रपतींना वेठीस धरून वाघनखांची जत्रा भरवली आहे. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळय़ात घुसतील!