हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची नोंदवलेल्या निरीक्षणामुळे शिंदे गटाच्या पोटात गोळा येण्याची शक्यता आहे. आमदारांच्या जीवाला धोका आहे म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी साठी बोलवणे म्हणजे सरकार पाडण्यासाठीचे पाऊल होत असे दिसतंय अशी टिप्पणी सरन्यायाधिशानी केली. तसेच 3 वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला असा सवाल करत सरन्यायाधिशानी कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
कोर्टात नेमकं काय घडलं?
राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी युक्तिवाद करत आमदारांच्या जीवाला धोका होता अशी माहिती कोर्टात दिली. 38 आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे राज्यपालांना सांगितलं असं त्यांनी म्हंटल. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या भाषणातील काही उल्लेखाचा दाखला सुद्धा कोर्टात दिला. विधिमंडळ पक्षाने शिंदेंची गटनेता म्हणून नियुक्ती केली होती . 38 आमदारांनी मिळून ठराव मंजूर केला आणि राज्यपाल आणि संभापतींना पाठवला असेही त्यांनी सांगितलं.
सरन्यायाधीश यांचे निरीक्षण काय?
जीवाला धोका म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावंण अयोग्य आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी साठी बोलवलं हे म्हणजे सरकार पाडण्यासाठीचे पाऊल होत असे दिसतंय. सरकार पडेल असं कोणतेही कृत्य राज्यपालांनी करायला नको होते. राज्यपालांचं अस वागणं हे लोकशाही साठी घातक आहे असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हंटल.
अशा घटनांमुळे राज्याला कलंक लागतो. महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. 3 वर्षाचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला ? बंडखोर आमदार ३ वर्ष राज्यपालांकडे गेले नाहीत. 3 वर्ष एकही पत्र लिहिलं नाही आणि 1 आठवड्यात कशी काय ६ पत्रे लिहिले असा सवालही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला. राज्यपालांच्या निर्णयावर व्यक्तिगत नाराज असल्याचे त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान, कोर्टाच्या या निरीक्षणामुळे शिंदे गटाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.