हॅलो महाराष्ट ऑनलाईन । ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाण्याच्या कासारवडवली वाहतूक उपविभागाने मुंबई मेट्रो लाईन ४ साठी सुरू असलेल्या बांधकामाच्या पार्श्वभूमीवर एक वाहतूक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार, ठाणे-घोडबंदर रोडवरील काही भाग विशिष्ट ठिकाणी जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. सदर मार्ग हे २२ जून ते १४ जुलै दरम्यान रात्रीच्या वेळी – रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद राहील असं सांगण्यात आलं आहे. ठाणे परिसरातील नेमके कोणते रस्ते बंद असतील? त्यासाठी पर्याय मार्ग कोणते आहेत? याबाबत माहिती घेऊया.
MMRDA मार्फत मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लि. कंपनी कडून मुंबई मेट्रो ४ चे काम करण्यात येणार आहे. नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑईल पंप आणि नागलाबंदर ते भाईंदरपाडा असं काम आहे. या दोन्ही मेट्रो लाईन वर आय आणि यू गर्डर बसवणे तसेच टी आणि एल प्रीकास्टचे काम सुरु करण्यात येणार आहे. हे काम २२/०६/२०२५ ते दिनांक १४/०७/२०२५ या कालावधीत होणार असल्याने ठाणे-घोडबंदर रोडवरील काही भाग विशिष्ट ठिकाणी जड वाहनांसाठी तात्पुरते बंद केले जातील. परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
१) ठाणे घोडबंदर वाहिनीवरील गायमुख स्टेशनचे & U Grider चे काम करताना घोडबंदरच्या दिशेने जाणान्या सर्व जड अवजड वाहनांना पिलर नं. ८५ जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. ही वाहने पिलर क्रमांक ८५ वरून पोरबंदर ठाणे मुख्य रस्त्याकडे उलट मार्गाने जातील, नंतर पिलर क्रमांक १०२ वर उजवीकडे वळून इंडियन ऑइल पंपसमोरील मुख्य रस्त्यावरून पुढे जातील. तर याच कालावधीत हलकी वाहने पिलर नं. ८५ जवळून सर्व्हिस रोडने जाऊन पुढे इंडियन ऑईल पंपसमोर मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.
२) घोडबंदर ठाणे वाहिनीवर गर्डरचे काम करताना ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नागला बंदर व आशा वाईन शॉप जवळ ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे. अशावेळी सर्व प्रकारची वाहने नागला बंदर डिपी ७२, ७३ व आशा वाईन शॉप येथुन सर्व्हिस रोडने जावून लोढा स्प्लेन्ड्रा येथे घोडबंदर ठाणे वाहीनी मुख्य मार्गावरुन इच्छीत स्थळी जातील. सदर वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही.