ठाणे । ठाण्यातील शिवसेना नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मालमत्तेच्या वादातून सावत्र भावानेच ही हत्या केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. माणिक पाटील यांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या करुन मृतदेह वाशीच्या खाडीत टाकण्यात आला. पाटील यांच्या घरातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने देखील चोरीला गेले असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. बंगल्याची वाटणी आणि मालमत्तेच्या वादातून ही हत्या केल्याचे सांगितले आहे.
राकेश माणिक पाटील (३४) असे हत्या करण्यात आलेल्या नगरसेवक पुत्राचे नाव आहे. शिवसेनेचे नगर माणिक पाटील हे ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहण्यास आहे. राकेश हा जवळच असणाऱ्या शिवसृष्टी इमारत येथे राहण्यास होता. २० सप्टेंबर रोजी रात्रीपासून बेपत्ता असणाऱ्या राकेश पाटील यांचा मोबाईल फोन बंद लागत असल्यामुळे माणिक पाटील यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
राकेशचा शोध सुरू असताना माणिक पाटील यांच्या बंगल्यातील साडेतीन किलो सोन्याचे दागिने गायब असल्याचे माणिक पाटील यांच्या लक्षात आले. नगरसेवक पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांना कळवले. मुलगा आणि सोनं गायब झाल्यामुळे कासारवडवली पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी राकेशच्या शोधासाठी पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले.
राकेशचा शोध सुरू असताना त्याची मोटारसायकल माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह यांच्याकडे पोलिसांना सापडली. पोलिसांनी संशयावरून गौरव सिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करताच त्याने राकेशची हत्या करून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली दिली. सचिन पाटील हा राकेशचा सावत्र भाऊ असून त्याने बंगल्याच्या वाटणीवरून राकेशची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून मृतदेह वाशीच्या खाडीत फेकला असल्याची कबुली गौरव सिंह याने पोलिसांकडे दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.