सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील सलगरे येथील म्हैसाळ योजनेच्या पाण्याची कर्नाटकात चोरी केली जात आहे लाखो लिटर पाण्याची राजरोस विक्री होत असल्याची तक्रार आमदार सुरेश खाडे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांकडे केली. या प्रकारामुळे मशाल योजनेच्या खर्या लाभार्थ्यांना पाणीपट्टी भरून हे पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कर्नाटकात चोरीला जात असलेले पाणी तात्काळ थांबवावे अशी मागणी करण्यात आली.
म्हैसाळ योजनेतील पाणी चोरीबाबत आ. खाडे यांनी ग्रामस्थांसोबत जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. सलगरे येथील सांभारे पाझर तलावाखालील काठाला कर्नाटकातील काही शेतकर्यांनी जागा विकत घेऊन विहिरी काढले आहेत. या विहिरीत म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले की पाणी साठवले जाते. तेथुन आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक हद्दीतील अरळीहट्टी या गावच्या शिवारात पाणी नेले जाते. हा प्रकार मागील आठ वर्षांपासून राजरोस चालू आहे. ज्या लोकांनी कर्नाटकात पाणी नेले, त्या पाण्याचा शेतीसाठी वापर होत नसून टँकर साठी विक्री केली जाते. एक हजार रुपये टँकर या दराने राजरोस विक्री करून लाखो रुपये संबंधितांनी मिळवली आहेत. पाण्याची चोरी होत असल्याने म्हैसाळ योजनेचे खरे लाभार्थी असलेल्या शेतकर्यांना पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकातील शेतकर्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पाझर तलाव भरून घेण्याचे धोरण असतानाही सलगरे येथील चमकेरी पाझर तलाव अद्याप भरलेला नाही. सांभारे तलावात पाणी सोडले आहे, परंतु कमी प्रमाणात सोडले जाते. त्यामुळे हा तलाव पूर्णपणे भरणार नसल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सलगरे विकास सोसायटीचे अध्यक्ष नाथाजी पाटील, उपाध्यक्ष कैलास कोष्टी, विजय पाटील, कमाल साहेब मालगावे, मोहन माळी, विजय मिरजे, रमेश पाटील, विक्रम कांबळे, विजय परीट, बाळासाहेब सावंत, राजेंद्र शिंदे, दीपक पाटील, तुकाराम शिंदे, बजरंग पाटील, दिलीप पाटील, शशिकांत हिरेमठ, रमेश शेळके, संतोष हारगे, अशोक कुंडले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.