कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शेणोली येथील सुमारे 400 वर्षांपूर्वीचे पुरातन श्री अकलाई देवीचे मंदिर विकासापासून वंचित राहिले आहे. दोन जिल्ह्याच्या सीमेवर मंदिर असल्याने हद्दीचा मुद्दा हा जटील प्रश्न आहे. तर सभोवती वनक्षेत्र असल्याने मंदिर विकासासाठी योजना राबवताना मर्यादा पडत आहेत. या अडचणीमुळे मंदिराचा विकास अडचणींच्या फितीमध्ये अडकला आहे. देवीचे महात्म्य सर्वदूर पसरले असताना परिसरात झालेला जेमतेम विकास भाविकांना पसंद पडेनासा झाला आहे.
शेणोली गावाजवळच्या डोंगर कपारीत हे मंदिर आहे. अकलूज येथील श्री अकलाई देवस्थानशी या देवस्थानचे साम्य आहे. सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. याआधी जंगली झाडीत हे मंदिर होते. कालांतराने भाविकांच्या मदतीतून तेथील विकास सुरू झाला. आणि भाविकांची वर्दळही वाढली. श्रावण महिन्यातील दर मंगळवार, हुताशनी पौर्णिमा व नवरात्र काळात तेथे मोठी गर्दी होते. आजमितीला सुसज्ज गाभारा, सभामंडप, निवासासाठी खोल्या व शौचालय आदी सुविधा आहेत. वनविभाग, सामाजिक संस्था व लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही झाले आहे.
मंदिर परिसराचे सौंदर्य खुलावे, यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणी भेडसावत आहेत. गावाकडून मंदिर पायथ्याशी येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला सातारा जिल्हा तर उजव्या बाजूला सांगली जिल्ह्याची हद्द आहे. हीच तेथील सीमारेषा असावी. त्यामुळे मंदिराची नोंद नसावी, असा कयास बांधला जातो. जिल्हा हद्द व सभोवतीच्या वनक्षेत्रामुळे कोणताही शासकीय निधी आणताना अडथळा होत आहे. त्यामुळे लोकसहभागातून विकास साधण्यात भाविकांनी सातत्य राखले आहे.
याबाबत गावचे सुपुत्र व कराडच्या विजय दिवस समारोह समितीचे कार्यवाह कर्नल संभाजीराव पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वनमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्याकडे अकलाई देवस्थानास तीर्थक्षेत्र विकासात दर्जा मिळावा, याकरिता प्रस्ताव दिला होता. मात्र राजकीय स्थित्यंतरात हा प्रश्न रेंगाळत पडला. तर काही वर्षापूर्वी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडेही ग्रामस्थांनी साकडे घातले होते. हे देवस्थान वन पर्यटन केंद्र किंवा वन विभाग तीर्थक्षेत्र विकास केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती प्रबळ गरजेची : डाॅ. संदीप पाटील
मंदिराकडे पायथ्यापासून जाताना पायी रस्ताच असावा, जेणेकरून देवीचे पावित्र्य टिकेल. पावसाळ्यात पायवाटेच्या रस्त्यात डोंगरातील पाणी आल्याने तो वाहून जातो. हे टाळण्यासाठी पाण्याचा आउटलेट काढणे व मंदिराजवळच्या पुरातन विहिरीचे संवर्धन व्हावे. मंदिर विकासासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती प्रबळ होणे गरजेची असल्याचे डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले.