कुत्रिम ऑक्सिजनवर असणाऱ्या ८५ वर्षांच्या आज्जीनी बजावला मतदानाचा हक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी| प्रथमेश गोंधळे ,

मंगळवार, वेळ – दुपारी साडेतीनची, ठिकाण – मतदान केंद्र क्रमांक १४ गार्डी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची खोली अचानक गाडीतून तिघे – चौघे ऑक्सिजनवर असलेल्या एका ८५ वर्षीय वृध्देला घेऊन मतदान केंद्रात येतात… असा काहीसा धक्कादायक प्रकार. गेल्या दोन महिन्यापासून ऑक्सिजनवर असलेल्या गार्डी येथील श्रीमती कुसूम बाबर या आजीबाईने आज लोकसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानावेळी मतदानाचा हक्क बजावला.

आजीबाईने आपल्या कृतीतून मतदानाचा हक्क प्रत्येकाने आवर्जून बजावला पाहिजे, असा संदेश दिला आहे. तर मतदान करण्यास टाळाटाळ करणाऱ्या धडधाकट व्यक्तींना चांगलीच चपराक दिली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गार्डी येथील श्रीमती कुसूम बाबर या आजीबाई दम्याच्या विकाराने आणि वृध्दापकाळाने आजारी आहेत. परंतु कुसूम बाबर यांचे पती सुबराव बाबर हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्या गेल्या दोन महिन्यापासून ऑक्सिजनवर आहेत. आज लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होते. त्यामुळे त्या आजीबाईनी लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु घरची मंडळी व नातेवाईक आजीबाई कुसूम त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे ऑक्सिजनवर असल्यामुळे तयार नव्हते. परंतु वैद्यकीय सल्ल्यानंतर आणि आवश्यक ती काळजी घेऊन मुलांनी घरातून त्यांना चारचाकी गाडीत बसवून ऑक्सिजनसह दुपारी साडेतीन वाजता मतदान केंद्रावर आणले. त्यामुळे केंद्रात मतदानासाठी ऑक्सिजनसह आलेल्या आजीबाईला पाहून मतदान अधिकारी चक्रावून गेले. परंतु आजीबाईचा मतदान करण्याबाबतचा उत्साह पाहून मतदान अधिकारी आणि रांगेत उभारलेले मतदारही चकित झाले.

Leave a Comment