अखेर ठरलं! येत्या 14 सप्टेंबरला होणार अपात्र आमदारांची विधिमंडळात प्रत्यक्ष सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर येत्या 14 सप्टेंबर रोजी अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 14 सप्टेंबर रोजी ठीक 12 वाजता सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू करतील. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. या सुनावणीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला अपात्र आमदारांचा तिढा सुटू शकतो.

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अपात्र आमदारांची सुनावणी एकाच दिवशी सभागृहात होणार आहे. राहुल नार्वेकर सर्व 54 आमदारांची सुनावणी एकाच दिवशी करतील. यावेळी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावे लागणार आहे. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपली बाजू मांडता येईल. 34 यांचिकांवर सुनावणी होत असताना प्रत्येक आमदाराला बोलण्याची संधी दिली जाईल. त्यामुळे या सुनावणीत कोणता आमदार काय भूमिका मांडेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेत बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली. यानंतर पक्षाच्या चिन्ह सोबत ते अपात्र आमदारांच्या मुद्द्यांपर्यंत ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला. शेवटी हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला. परंतु न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी करण्याचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले. त्यानंतर राहुल नार्वेकर या अपात्र आमदारांप्रकरणी कधी सुनावणी घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आता येत्या 14 सप्टेंबर रोजी अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर सुनावणी पार पडणार आहे.