व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : पुसेसावळीतील दंगल-हत्येप्रकरणी 23 जण ताब्यात; आयजी सुनील फुलारी साताऱ्यात तळ ठोकून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टच्या वादातून साताऱ्यातील पूसेसावळी गावात रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीत वाहने, घरे आणि दुकाने पेटवून देण्यात आली. तसेच दगडफेक करण्यात आली. यामध्ये १० जण जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. नुरहसन शिकलगार (वय 27, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले असून 23 संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे.

फुलारी यांनी आज औंध विश्रामगृह येथे पुसेसावळी येथील घडलेल्या घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

2 स्वतंत्र गुन्हे दाखल

पुसेसावळीतील दंगली प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दंगलीत झालेल्या मारहाण, दगडफेकीत एकाचा मृत्यू झाल्याने खुनाचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 23 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले.

सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर कोणतीही चुकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा, कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

नेमकं काय घडलं?

दंगली संदर्भात माहिती देताना सुनील फुलारी म्हणाले की, इंस्टाग्रामवरील पोस्टवर एका समूहाच्या दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांची चौकशी सुरू होती. याच दरम्यान आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या समूहाच्या तरूणांकडून रविवारी (दि. १०) आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आली. त्यानंतर रात्री साडे नऊच्या सुमारास दुसऱ्या समूहाच्या सुमारे दीडशे तरूणांनी जमाव जमवून दुचाकी, चारचाकी वाहने पेटवून दिली. पहिल्या समूहातील तरूणांना मारहाण करून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड सूरू केली.

पोलिसांनी जमाव पांगवला

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बाळाचा वापर करून जमावास पांगवण्यात यश मिळवले. दंगलीत झालेल्या मारहाणीमध्ये एकूण 10 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती चांगली आहे. एका जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याचे आयजी सुनील फुलारी यांनी सांगितले.

जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता

रविवारी रात्री उशिरा झालेल्या दंगलीनंतर जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण बनले प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. या परिस्थितीत शाळा-कॉलेज सोडून देण्यात आली. सध्या संवेदनशील शहरांमध्ये बंदोबस्त तैनात असून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे.