“सातारच्या लेकीने मोठं व्हावं”; श्रीनिवास पाटील यांचे गौरवोद्गार

0
53
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा येथील सनबीम आयटी पार्कमध्ये श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला ‘ती’ चा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कला, क्रीडासह विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महिलांचा ‘आदिशक्ती पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी “सातारा जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने प्रत्येक क्षेत्रात मोठी झेप घ्यावी. तिने उज्ज्वल यश संपादन करावे. यासाठी त्यांना प्रोत्साहन व पाठबळ देणे गरजेचे आहे. महिलांचा आदर करणे, त्यांना सन्मान देणे हा खरा स्त्री शक्तीचा जागर आहे, असे गौरवोद्गार काढले.

यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने देश सेवा बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील सैनिकांच्या वीरमाता व वीरपत्नी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील लुप्त होत चाललेल्या पाककृती व पारंपारिक खाद्यपदार्थ यांच्या संवर्धनासाठी ‘सुगरण साताऱ्याची’ ह्या पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, समाजाला परिपूर्ण करण्यासाठी नारीशक्ती महत्वाची भूमिका बजावते. पुरस्कार एक मोठी जबाबदारी देऊन जातो. महिलांना आपापल्या क्षेत्रात काम करण्यासाठी हुरूप यावा, तसेच समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याची जाणीव होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पुरस्कार देण्यात येतो. आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवत प्रगतीची शिखरे पादाक्रांत केली आहेत.

सारंग पाटील म्हणाले, “स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. वेळोवेळी तिने तिचे वर्चस्व आणि क्षमता आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांचे योगदान व समर्पित वृत्तीमुळे महिला भगिनी कौतुकास पात्र आहेत. त्यांना अशीच प्रेरणा मिळत राहण्यासाठी यापुढे देखील त्यांच्यासाठी श्रीनिवास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यातून आदर्श महिलांची एक मोठी फळी यानिमित्ताने तयार होऊन ती समाजासाठी दिशादर्शक ठरेल. ”

यावेळी सौ. रजनीदेवी पाटील, श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील, कराडच्या माजी नागराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, सोल डिटोक्स टीमच्या ज्योती काटकर, सर्वेश जाधव, कुणाल घोडके, यांच्यासह जिल्ह्यातून आलेल्या विविध क्षेत्रातील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here