हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलगा आणि मुलगी यांच्यातील संमतीने संबंध ठेवण्याचे वय १८ वरून १६ वर्षे करण्याबाबत विचार करावा अशी विनंती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. आजच्या युगात इंटरनेटमुळे मुले लवकर तरुण होत आहेत असा अजब तर्क यावेळी न्यायालयाने लावला आहे. इंटरनेटमुळे सध्याची मुले लहान वयातच विकसित होत आहे आणि समजदार होत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी उचललेली पावले काही वेळा त्यांचे भविष्य अंधारात टाकतात असं कोर्टाने म्हंटल आहे.
18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पीडित मुलीशी अनेक तरुण आणि तरुण संबंध ठेवतात. यानंतर पोलिस त्यांच्यावर पोक्सो कायदा, बलात्कार यांसारखे गुन्हे दाखल करतात. विरुद्ध लिंगाच्या आकर्षणातून निर्माण झालेल्या संबंधांमध्ये मुले दोषी मानली जातात, परंतु हे सगळं ते अज्ञानातून वागतात. त्यामुळे अनेक किशोरवयीन मुले अन्यायाला बळी पडतात असं कोर्टाने म्हंटल.
नेमकं काय आहे प्रकरण ?
ग्वाल्हेरच्या थाटीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या राहुल जाटव याच्या विरोधात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 17 जुलै 2020 रोजी त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्याचे वकील राजमणी बन्सल यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, पीडित मुलीने २ जणांवर बलात्काराचा आरोप केला होता. 18 जानेवारी 2020 रोजी जेव्हा ही मुलगी कोचिंगसाठी राहुलच्या घरी जात असे.त्यावेळी त्याठिकाणी कोणीच नव्हत. कोचिंग डायरेक्टर राहुल जाट यांनी तिला ज्यूस दिला, त्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर राहुलने तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला आणि तरुणीशी संबंध प्रस्थापित केले.
व्हिडीओ व्हायरल करून संबंध प्रस्थापित करण्याची धमकी देऊन राहुल जाटव तिला सतत ब्लॅकमेल करत होता, असा आरोप आहे. त्यामुळे मुलगी गरोदर राहिली. कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये तिचा गर्भपातही झाला होता. पीडित मुलीने दूरच्या नातेवाईकावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोपही केला होता. दोन्ही लोकांच्या संमतीनेच परस्पर संबंध निर्माण झाल्याचे वकील बन्सल यांनी न्यायालयाला सांगितले. अशा स्थितीत त्याच्या अशिलाला खोटे ठरवण्यात आले आहे. त्यांनी हायकोर्टाला विनंती केली होती की, त्यांचे अशील राहुल जाटव यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा.
त्यानंतर एकूण सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने राहुल जाटव यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे आणि सध्याच्या या इंटरनेटच्या युगात किशोरवयीन मुलांमध्ये पूर्व- प्रौढत्व लक्षात घेता परस्पर संबंधांचे वय 18 वरून 16 पर्यंत कमी करण्याचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. जेणेकरून तरुणांवर अन्याय होऊ नये. विशेष म्हणजे दिल्लीतील निर्भया घटनेनंतर परस्पर संबंधांचे वय 16 वरून 18 वर्षे करण्यात आले होते.