कोल्हापूर | भाजपाचे नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. काही वेळात ते कोल्हापूरात येणार असल्याने चांगलेच वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आ. हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईनंतर पाच दिवसात किरीट सोमय्या अंबाबाईच्या दर्शनाला येत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात कोल्हापूरला येताना किरीट सोमय्यांना कराड रेल्वे स्थानकावर अडविण्यात आले होते. त्यामुळे मोठे राजकारण तापले होते. त्यामुळे आता दाैऱ्यात काय- काय होते याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
आ. हसन मुश्रीफ आणि त्याच्य जावयावर किरीट सोमय्या आरोप केले आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसात पुणे व कोल्हापूर येथे ईडीने मुश्रीफच्या घरावर, आॅफिसवर छापे टाकले होते. यावेळी हसन मुश्रीफ समर्थकांनी मोठी गर्दी करत किरीट सोमय्याचा निषेध व्यक्त केला. तसेच भाजपाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. तसेच या सर्व कारवाईवर कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्याचा हात असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.
मी आज रात्री 9 वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेस नी कोल्हापूर जाणार, उद्या सकाळी महालक्ष्मी मातेचे दर्शन आणि अन्य कार्यक्रम @BJP4Maharashtra pic.twitter.com/Tt56A88qgh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 15, 2023
किरीट सोमय्या यांना 20 सप्टेंबर 2021 रोजी कराड येथील रेल्वे स्थानकावर अडविण्यात आले होते. त्यानंतर राज्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. किरीट सोमय्यांना कराडमधून मुंबईला मागे फिरावे लागले होते. परंतु आता पुन्हा आज किरीट सोमय्या कोल्हापूरला निघाल्याने कोल्हापूरातील वातावरण तापलेले असल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे.
किरीट सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध करणार नाही : हसन मुश्रीफ
आज किरीट सोमय्या कोल्हापूरला येत असून कार्यकर्त्यांना मुश्रीफांनी शांततेचे आवाहन केले आहे. कोल्हापुरात यावं, अंबाबाईचं दर्शन घ्यावं, तसेच माझ्या कामांची माहिती घ्यावी असेही आवाहन मुश्रीफांनी केले आहे. त्यामुळे आजचा दाैरा कसा होणार याकडे आता राज्याचे लक्ष लागून आहे.