औरंगाबादची पिटलाईन जालन्याला पळवली ? फौजिया यांनी दाखवले थेट रेल्वेमंत्र्याचेच पत्र

औरंगाबाद – चिकलठाण्यात होऊ घातलेली रेल्वेची पीटलाईन अचानकपणे जालन्यात होणार, अशी घोषणा रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केल्यानंतर मराठवाड्यात चांगलेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जालन्याला आधीच ड्रायपोर्ट असताना रेल्वेची पीटलाईन तेथे नेण्याची गरज काय, असा सवाल केला जातोय. तसेच औरंगाबादची पीटलाईन जालन्याला वळवणाऱ्या दानवेंवर खासदार इम्तियाज जलील यांनीही तोंडसुख घेतले होते. तुम्ही देशाचे मंत्री आहात की जालन्याचे, जालन्याचे असाल तर नगरसेवकाची निवडणूक लढवा, असेही खा. जलील म्हणाले.

आता या वादात आणखीच पुराव्यादाखल उतरल्या आहेत, परभणीच्या खासदार फौजिया खान मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनीच औरंगाबाद येथे रेल्वे पीटलाइनची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने औरंगाबादेतील पीटलाइनला मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मंत्री दानवे यांच्या घोषणेला काहीच अर्थ नाही, असं वक्तव्य खासदार फौजिया खान यांनी केलं आहे.

खासदार फौजिया खान म्हणाल्या, ‘ रेल्वेच्या बैठकीत औरंगाबादेत व लातूरमध्ये पीटलाइन उभारणीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मी दिले होते. लातूरची मागणी अद्याप मान्य झालेली नाही. मात्र औरंगाबादची मागणी मान्य करून तसे लेखी पत्र मला मिळालेले आहे. आता रेल्वे राज्यमंत्री दानवे काहीही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला अर्थच नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. यात कुणाचेही दुमत नसेल’.