पतंगराव कदम यांचा शेअर्स सत्ताधाऱ्यांनी दिला नाही, पण मी घेणारच : मंत्री विश्वजित कदम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कृष्णेच्या सूज्ञ सभासदांनी रयतेचे राज्य आणावे. रयत पॅनेल सभासदांच्या ऊसाला दर देण्यात कमी पडणार नाही. रयतच्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी वाघासारखे लढावे, विजय आपला आहे, असे सांगून पतंगराव कदम यांचा मयत शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी मी कारखान्यांकडे अर्ज केला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी अजूनही मला शेअर्स दिलेला नाही. परंतु मी हा शेअर्स घेणारच व सर्व मयत सभासदांच्या वारसांना शेअर्स मिळवून देणार, असे आश्वासन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.

येडेमाच्छिंद्र (ता. वाळवा) येथे यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या प्रचार शुभारंभवेळी ना. कदम बोलत होते. प्रारंभी रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनी सर्व उमेदवारांसमवेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम, युवा नेते जितेश कदम, सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य धनाजी बिरमुळे, सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, जखिणवाडीचे आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, सदस्या सौ. मंगल गलांडे, कराड पंचायत समितीचे सदस्य उत्तमराव पाटील, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा छाया पाटील, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अविनाश नलवडे, कृष्णेचे माजी संचालक हणमंतराव पाटील, जयसिंगराव कदम, अशोकराव पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह रयत पॅनेलचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

ना. कदम म्हणाले, पावसात होणाऱ्या सभा विजय मिळवून देतात. हा नजीकच्या काळात घडलेला इतिहास आहे. कारखान्याच्या निवडणुकीत रयत पॅनेलच्या सभेस पाऊस आला म्हणजे हा शुभसंकेत मानावा, असे सांगून सत्ताधाऱ्यांचा अकार्यक्षम कारभार जाणून घ्या. आपले मत रयतेचे राज्य आणणाऱ्या रयत पॅनेलला देवून प्रचंड बहुमताने सर्व उमेदवार विजयी करा.

डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले, दिशा, विचार व लोकांच्या पाठबळामुळे कृष्णाकाठी वैभव उभे राहिले. ही निवडणूक राजकारणासाठी नाही. तर या निवडणुकीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, आमचे रयत पॅनेल समाजाची गतिमान प्रगती करण्यासाठी खुले सभासदत्व कायम राखणार, सभासदास मालक बनण्याचा अधिकार कायम राखणार, मयत शेअर्स ट्रान्स्फर प्रक्रिया राबवणार, नवसरंमजामशाही मोडून काढून रयतेचे राज्य आणणार, सवलतीची साखर व सभासद सुविधा गट कार्यालयाच्या माध्यमातून सभासदांच्या दारात पोहचवणार, ऊसतोड सुलभ व किफायतशीर करणार, बैठी पाणीपट्टी थांबवणार तसेच उच्चांकी ऊसदर देण्यासह गेटकेन बंद करणार हा आमचा जाहीरनामा आहे.

मनोहर शिंदे, डॉ. सुधीर जगताप, प्रा. अनिल जगताप, दौलतराव इंगवले यांची भाषणे झाली. यावेळी उमेदवार प्रमोद धनराज पाटील यांचा ना. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वसंतराव पाटील यांनी आभार मानले.

ना. विश्वजित कदम यांना सभासदत्व दिलेले नाही

ना. विश्वजित कदम यांना व माझ्या मुलाला विश्वेंद्र यांना कारखान्याने आजपर्यंत सभासदत्व दिलेले नाही. यशवंतराव मोहिते व पतंगराव कदम यांच्या वारसांची ही अवस्था तर तुम्हा सर्वसामान्य सभासदांची अवस्था काय? हा माझा सवाल डाॅ. इंद्रजित मोहिते यांनी केला.

Leave a Comment