हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबमधील जालंधर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी 3 मुलींचे मृतदेह बॉक्समध्ये आढळून आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण जालंधर परिसरात खळबळ माजली आहे. तसेच, या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी संशयित म्हणून पोलिसांनी मुलींच्या वडिलांना अटक केली आहे. मुलीच्या वडिलांनीच या तिन्ही लहान मुलींची हत्या केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
नेमक प्रकरण काय?
जालंधर शहरातील कानपूर गावात 3 सख्ख्या बहिणींचा मृतदेह एका बॉक्समध्ये घराच्या बाहेर आढळून आल्यामुळे खळबळ माजली. या तिन्ही मुली रविवारी संध्याकाळी 8 वाजता बेपत्ता झाल्या होत्या. अमृता, साक्षी, कंचन अशी या 3 सख्ख्या बहिणींची नावे आहेत. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आहे की, या तिन्ही मुलींचे वडील दारूच्या आहारी गेले होते. त्यामुळे नशेच्या अवस्थेत त्यांनीच मुलीची हत्या केली असू शकते. स्थानिकांनी दिलेले या माहितीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून मुलीच्या वडिलांना अटक केली आहे.
मुख्य म्हणजे, या तिन्ही मुली बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केले होती. त्यानंतर रविवारी रात्री पोलिसांनी संबंधित मुलींच्या घरी जाऊन या सर्व प्रकाराची चौकशी केली होती. मात्र त्यांच्या हाती कोणताही पुरावा लागला नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी स्थानिक जेव्हा घराच्या बाहेर आले, त्यावेळी त्यांना या बेपत्ता मुलींच्या घराबाहेर एक मोठा बॉक्स पडलेला दिसला. ज्यावेळी त्यांनी हा बॉक्स उघडून पाहिला तेव्हा त्यामध्ये या तिन्ही मुलींचे मृतदेह होते. हे मृतदेह पाहूनच स्थानिकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले.
दरम्यान स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी या तिन्ही मुलींच्या मृतदेहांना ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. तसेच, या सर्व घटनेचा तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासात या तिन्ही मुलींच्या शरीरावर कोणतेही खुणा आढळून आलेल्या नाहीयेत. त्यामुळे खेळता खेळता याच मुली बॉक्समध्ये जाऊन बसल्या असतील आणि वरून झाकण बंद झालं असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्याच्या घडीला पोलिसांकडून मुलीच्या वडिलांची चौकशी सुरू आहे.