कराड | जानुगडेवाडी- थोरातवस्ती (ता. पाटण) येथील 77 वर्षीय वृद्धमहिला कलाबाई नायकू थोरात या राहत्या घरातून 21 डिसेंबर पासून बेपत्ता झाली होती. याबाबत ढेबेवाडी पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद झाली होती. तब्बल 29 दिवसांनी डोंगराच्या मध्यावर तिचा सडलेल्या स्थितीतील मृतदेह आढळला. पाटण तालुक्यातील नाईकबा डोंगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.
पोलिसांनी सांगीतले की, नाईकबा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या जानुगडेवाडीतील कलाबाई थोरात यांचा स्मृतीभ्रंश झाला होता. दि. 21 डिसेंबर रोजी त्या नातेवाईकांना काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या. काही दिवसांपुर्वी त्या नाईकबा डोंगरावर काही ग्रामस्थांना दिसल्या. त्याबाबत ग्रामस्थांनी कलाबाई यांच्या पुतण्याला माहिती दिली. पुतण्याही त्यांना आणण्यासाठी डोंगरावर गेला. मात्र, तेथुनही त्या बेपत्ता झाल्या. दरम्यान, काल सकाळच्या सुमारास एका शेतकऱ्यांची शेळीच्या पाठीमागे डाग नावाच्या ,डोंगराच्या मध्यावर आला असता. त्या शेतकऱ्यांला साडी दिसली, त्या शेतकऱ्यांला संशय आल्याने त्याने प्रथम पोलीस पाटील संग्राम पांढरपट्टे व दत्तात्रय कुंभार यांना फोनवर माहिती दिली.
पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यावर ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी व नवनाथ कुंभार, प्रशांत चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. सदर मृतदेहाची अवस्था वाईट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूवरून हा मृतदेह कलाबाई थोरात यांचा असल्याची त्यांच्या कुटुंबाने खात्री केली. जागेवरच शवाविच्छेदन करून अंतिम संस्कार त्याच ठिकाणी करण्यात निर्णय घेतला. याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मयत अशी नोंद करण्यात आली आहे.