कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. दत्ता रघुनाथ शिर्के (रा.अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. तीन दिवसानंतर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक नेहमीप्रमाणे जनावरे चरण्यासाठी घेऊन गेला होता. त्यानंतर जनावरे धुण्यासाठी पाझर तलावाजवळ त्याने नेली होती. यावेळी त्याचा पाय घसरून तो पाण्यात बुडाला. याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळतात ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. शनिवारी ग्रामस्थांनी दत्ता याचा शोध घेतला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या घटनेमुळे अवसरी गावावरती दुःखाचा शोककळा पसरली आहे. शनिवारी, रविवारी आणि सोमवारी दिवसभर शोध मोहीम सुरू होती. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दत्ता शिर्के यांचा मृतदेह आढळला. रात्री उशिरा 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा येथील शिवेंद्रसिंहराजे भोसले ट्रेकर्स, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि बामणोली ट्रेकर्सकडून शोध मोहीम राबवली होती.