सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाड येथून वाईमध्ये आलेल्या वऱ्हाडाच्या खासगी बसला सकाळी नऊच्या सुमारास पसरणी घाट उतरून वाई शहरात आल्यानंतर आग लागली. बसच्या इंजिनमधून अचानक धुराचे लोट येऊ लागल्याने नागरिकांनी सदरची घटना चालकाच्या निदर्शनास आणली. चालकाने तात्काळ सावधानता बाळगत नवरीसह वऱ्हाडीमंडळीना गाडीतून खाली उतरले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी, गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीतून जाळ अन् धूर संगट निघाल्याने वऱ्हाडी मंडळी चागंली घाबरली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महाड येथून महाबळेश्वर मार्गावरून पुढे वाई शहराच्या दिशेला आलेल्या बसला बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. लग्नाच्या वऱ्हाडींना घेऊन खासगी बस (एमएच- 06- बीडब्ल्यू- 8008) ही वाई-पसरणी घाट उतरत होती. वाईमध्ये एसटी बसस्थानक परिसरात ही बस आली असता, बसमधून धूर येत असल्याचे नागरिकांनी चालकास सांगून सतर्क केले. चालकाने प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील नवरीसह सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन दलाला अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेमुळे वाई-पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.