बीड – परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या कारची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन आज दुपारी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात गाडीचा पूर्ण चक्काचुर होऊन, मृत व जखमींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी कारने (एमएच 13 सीके 0441) भोकर येथून तेलगावमार्गे बीडला जात असताना तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार जवळ सदर कार आली असताना चालकाचे स्टेरिंगवरील नियंत्णर सुटल्याने गाडी रोडच्या लगत खड्ड्यात असलेल्या बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात चालक व चालकाच्या बाजूच्या सिटवर बसलेला तरूण जागीच ठार झाले. मागच्या सिटवर बसलेला तरूण समोरच्या व मागच्या सिटमध्ये अडकला. मृत व जखमी भोकरचे असुन, नेमके कुणाचे नाव काय आहे याची ओळख पटत नाही. तरीही त्या तरूणांच्या मोबाईलवर आलेल्या फोनच्या अंदाजावरून मृतात युनुस शेख व सचिन मोकमपल्ले यांचा समावेश असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. त्या तरूणाचे पाय मोडला. गावालगतच अपघात झाल्याने अमर बिअरबारचे मालक कांता लगड हे इतर नागरिकांना घेऊन तात्काळ घटनास्थळी गेले. अपघात झाल्याचे समजताच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु ते बाहेर काढता येथ नव्हते. त्यामुळे गॅस वेल्डिंगने वेल्डिंग करून, एका मृतास बाहेर काढले. तर जखमी व अन्य एका मृतास जेसीबीच्या साहाय्याने पोलीस कर्मचारी व नागरिकांनी बाहेर काढले. यानंतर मृत व जखमींना 108 रूग्ण वाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड तसेच जेसीबी मालक मच्छिंद्र माने तसेच शेकडो नागरिकांनी माणुसकी दाखवत कारमधील मृत व जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढत एका जखमी तरूणाचा जीव वाचवला.