आमदार बोरनारे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे व कुटुंबियांना लोक सुरक्षेचा विसर पडला असून ते मस्तवालपणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आमदार बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीने या घटनेचा निषेध केला. आज भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देणार आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याने 18 फेब्रुवारी रोजी आमदार बोरणारे यांच्यासह दहा जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या घटनेचे राजकीय तसेच सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. आमदार झाल्या पासून बोरनारे व कुटुंब तसेच समर्थक पक्ष संघटनेत मस्तवालपणे वागत असून गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार जानेवारीत समोर आला. आजी व माजी असे दोन गट तालुका पक्षसंघटनेत पडले. त्यातच कौटुंबिक वादातून मारहाणीच्या घटनांमुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्यात आमदार बोरनारे व कुटुंब हातभार लावत आहे. या सगळ्या प्रकरणी पक्षप्रमुख काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार बोरनारे कुटुंबाने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचा स्वतःच्या कौटुंबिक वादासाठी गैरवापर केला आहे. भावजयीला राजकीय द्वेषापोटी मारहाण केली. त्या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर खाजगी सचिवाला पुढे करून मारहाण झालेल्या फिर्यादी वरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले. त्यामुळे जयश्री बोरणारे यांच्यावर दाखल ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करून त्याचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे रिपाई (आठवले गट) युवक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी गृहमंत्री, पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.