औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल दीड वर्ष शाळा महाविद्यालय बंद होते. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगर पालिका हद्दीतील 8 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी काढले आहेत.
शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. प्रशासक आस्तिक कुमार पांडे या समितीचे अध्यक्ष असतील तर, सदस्य म्हणून उपायुक्त तथा विभाग प्रमुख, सर्व वॉर्ड अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा समितीमध्ये समावेश असेल.
या आहेत नियम व अटी –
• शाळा सुरू करण्यासाठी 48 तासांपूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक
• केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ते लेखी संमती पत्र घ्यावे.
• ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी कोरोना मुक्त झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहावे.
• सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, खाजगी वाहन चालक, रिक्षा चालक यांनी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आवश्यक आहे.