औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे शहराच्या सीमेवरच कोरोनाला रोखण्यासाठी पाच एन्ट्री पॉइंटवर पुन्हा कोरोना चाचणीसाठी आरोग्य पथके तैनात केली जाणार आहेत. येत्या दोन दिवसात इंट्री पॉईंटवर कोरोना चाचणी सुरू करण्याचे नियोजन आरोग्य विभाग करीत आहे.
गतवर्षी बाहेरगावहून औरंगाबादला येणाऱ्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने चिकलठाणा येथील केंब्रिज शाळा, सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा याठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथक तैनात केले होते. बाहेरगावाहून येणाऱ्याची चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना शहरात प्रवेश दिला जात होता . त्यावेळी एंट्री पॉईंट वरील चाचण्यांमुळे चाळीस हजार लोक बाधित होण्यापासून वाचवण्याचा दावा करण्यात आला होता.
दरम्यान शहरात आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे.गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ९०२ रुग्ण आढळून आले त्यामुळे शहराच्या इंट्री पॉईंटवर पूर्वीप्रमाणेच कोरोना चाचणी करण्याचे नियोजन केले जात आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. त्यामुळे काही प्रमाणात संसर्गाला ब्रेक लागेल, असा विश्वास डॉ. पाडळकर यांनी व्यक्त केला.
चौकट व्यापाऱ्यांसाठी सहा पथके शहरातील व्यापाऱ्यांना व दुकानातील कर्मचाऱ्यांसह कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. यासाठी पालिका स्वतंत्र सहा टीम उपलब्ध करून देणार असल्याचे डॉक्टर पाडळकर यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा