सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खटाव नजीक असलेल्या येरळा नदीच्या पात्रात एक वृध्द चरायला नेलेली जनावरे घेवून घरी परतताना पूराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. भिकू आकोबा पाटोळे (वय- 60) असे सदरील इसमाचे नाव असून आज सोमवारी दि. 12 रोजी ते मयत अवस्थेत आढळून आले आहेत. याबाबतची पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी दि. 11 रोजी दुपारी बारा वाजता जनावरे चरायला घेवून गेलेले भिकू पाटोळे घरी परतले नाहीत. सायंकाळी उशिरा चरायला नेलेल्या जनावरांमधील एक म्हैस घरी परतली. परंतु भिकू पाटोळे व इतर गुरे परत न आल्याने नारायण वसंत पाटोळे, बंधू दीपक भिकू पाटोळे, भावकीतील संजय गोविंद पाटोळे, संजय भिवा जाधव यांनी मिळून त्यांचा शोध शिरस वस्ती शिवारात घेतला. परंतु ते सापडले नाहीत.
त्यानंतर आज सोमवारी दि. 12 रोजी पुन्हा शोध सुरू असताना येरळा नदीच्या पात्राकडे गेले असता, नदीपात्राचे पाण्यात भिकू अकोबा पाटोळे मृत्यू झालेल्या अवस्थेत दिसून आले. तेथे एक रेडकु नदीपात्र्याचे पाण्यात वाहून जाऊन शेजारी उभे होते व बाकीची गुरे आजूबाजूला चरत होती. याबाबतची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली, प्राथमिक तपासाच्या अंदाजानुसार भिकू पाटोळे येरळा नदीच्या काठाने घरी येत असताना येरळा नदीला पूर आल्याने ते प्रवाहात वाहून गेल्याने मयत झाले असल्याचे निदर्शनात आले. याबाबतची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली, असून पुढील तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.