औरंगाबाद – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे चित्र असल्याने विविध जिल्हा आणि शहरांमधील शाळा पूर्ववत ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यासंबंधी विचार सुरु आहे. राज्य शासनाने यासाठी परवानगी दिलेली असली तरीही जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रशासनाने स्थानिक पातळीवरील स्थिती पाहून निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यातच आता ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासन सावधगिरीने पावले टाकत आहे.
औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील शाळांबाबतचा निर्णय आज 10 डिसेंबर रोजी घेण्यात येणार होता, मात्र तो आणखी पाच दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. शहरातील शाळा सुरु करण्याबाबचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याता आल्याची माहिती महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिली. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पुन्हा 15 डिसेंबर रोजी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शहरातील शाळा सुरु होण्यासंबंधी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती टेंगळे यांनी दिली.
पुणे-पिंपरी चिंचवड आणि नाशिक महापालिकेचा निर्णय लांबणीवर पडल्यानंतर औरंगाबाद शहरातली वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे.