औरंगाबाद – शहराचा विकास जातीय वादात अडकला आहे. त्याचमुळे अतिशय महत्त्वाच्या व रहदारीच्या या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. स्थानिक मनपा प्रशासनाचा हलगर्जीपणा याठिकाणी सिद्ध होतो. मनपा व शासकीय अधिकारी नुसते बसुन राहतात. तसेच कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत. अशी घणाघाती टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी टीका करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या नेतृत्वावरही निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गुलमंडी येथील औषधी भवन पुलावरील नाल्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
मंगळवारी रात्री औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाली. यात गुलमंडी भागातील अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर गुलमंडी रोड, औषधी भवन येथील पुलाच्या रेंगाळलेल्या कामाचा आढावा व स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीौते आमदार सतिश चव्हाण यांनी स्वेच्छेने भेट दिली. यावेळी ते म्हणाले औरंगाबाद शहराचा विकास जातीयवादाच्या लढाईतच अडकून पडला आहे. त्यातच अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न मागे राहत आहेत.
त्यातीलच एक हा प्रश्न औषधी भवन जवळील नाल्याचा. आज ही परिस्थिती केवळ महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे आल्याचे ते म्हणाले. तसेच चव्हाण यांनी इमारतीच्या खालच्या स्वच्छतेसाठी लागणारा अंदाजे ३.५० लाख रु. खर्चाची आर्धी रक्कम मी स्वतः देतो व व्यापारी महासंघाने स्थानिक व्यापाऱ्यांमार्फत खर्च करावा असे सुचवले. यास महासंघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी होकार देउन कबुल केले. आता आम्हाला महानगरपालिकेच्या सहकार्याची अपेक्षा नाही असे आयुक्तांना कळविण्याचे सुध्दा ठरविण्यात आले आहे.